सिंधुदुर्ग : राज्याच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुरुवातीला नाराज नसल्याचं सांगणारे दीपक केसरकर यांनी आता मात्र त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला, त्यांची मला कीव वाटते असं दीपक केसरकर म्हणाले. मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील. कदाचित मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

माझं मंत्रिपद देव ठरवतो

दीपक केसरकर म्हणाले की, "अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे."

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले आहेत ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

मला केंद्रातल्या नेत्यांचा पाठिंबा

दीपक केसरकर म्हणाले की, "मला केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काळजी नाही. कुठल्याही मंत्र्याने कामं केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात असताना केली. मराठी भाषा विभाग, मुंबई शहर असो वा शिक्षण विभाग असो, या विभागात मी मोठी कामं केली. मी केलेल्या कामांची माहिती पुस्तिका काढणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ राहिल असंच काम मी या आधी केलंय आणि पुढच्या काळातही करेन."

नाणारवरून मतभिन्नता?

नाणार रिफायनरीवरून कोकणातील नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शभंर टक्के होणार असं एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरीकडे माजीमंत्री आणि आमदार दिपक केसरकर यांनी ही रिफायनरी 'ग्रीन रिफायनरी' आहे का हे तपासून पाहाव लागेल अस वक्तव्य केलं. त्यामुळे नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील असलेली मतभिन्नता समोर आली आहे.

उदय सामंतांना जगभराची माहिती

रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला आहे. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोला दिपक केसरकर यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

ही बातमी वाचा:

मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

Deepak Kesarkar : मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी मंत्र्यापेक्षाही वरच्या पदावर जाईन : दीपक केसरकर
December 24, 2024
0